वाई चा महागणपती ! जाणता राजा युवा प्रतिष्टान

वाई चा महागणपती !
गणपती घाटावरील महागणपतीचे मंदिर हे वाईतील पर्यटकांचे खास आकर्षण होय.गणपतीच्या विशाल व भव्य मूर्तीमुळे ते ‘ढोल्या गणपती ‘या नावाने अधिक परिचित आहे.हे मंदिर गणपतराव भिकाजी रास्ते यांनी जवळजवळ कृष्णानदीच्या पात्रातच बांधले आहे. मंदिराचे विधान चतुरस्त्र असून वारंवार येणाऱ्या पुरांपासून संरक्षण व्हावे,म्हणून गर्भगृहाच्या पश्चिमेकडिल मागील भिंतीची रचना मधोमध त्रिकोणी आकार देऊन नावेच्या टोकासारखी म्हणजे मत्स्याकार बांधली आहे. त्यामुळे पुराच्या वेळी पाणी दुभंगले (कापले) जाऊन पाण्याचा दाब कमी होतो व मंदिर सुरक्षित राहते. गर्भगृहात अर्द्या मीटर उंच चौथ-यावर-गजाननाची रेखीव बैठी एक मीटर व ८० सेमी.उंच व दोन मीटर रुंद भव्य डाव्या सोंडेची मुर्ती आहे. तिची स्थापना शके १६९१ वैशाख शु .१३ रोजी करण्यात आली .
मूर्तीचे स्वरूप बाळसेदार असल्यामुळे याला कदाचित ढोल्या गणपती हे नामाभिधान प्राप्त झाले असावे . ती एकसंध काळ्या दगडात खोदली असून हा दगड कर्नाटकातून आणला असून प्रथम तो थोडा मऊ असावा व पुढे हळूहळू कठीण झाला असावा. सध्या मुर्त्तीला रंग दिलेला असल्यामुळे तिचे मूळ रूप दिसत नाही. गणपती उकिडवा दोन्ही मांड्या पसरून पाय रोवून बसला आहे. प्रसन्न मुद्रेतील गणपतीने यज्ञोपवितासह मोजके अलंकार घातले आहेत. त्यांत गळ्यातील हार,बाजूबंद व पायांतील तोडे स्पष्ट दिसतात. मुर्तीची मागील अर्ध चंद्राकृती प्रभावळ ३ मी. ६३ सेमी. उंचीची आहे. गणपतीच्या चारी हातांत (डावीकडून) मोदक ,परशू,पळी आणि दात ही आयुधे आहेत. गणपतीच्या दोन्ही पायांदरम्यान त्याचे वाहन उंदीर प्रतीकात्मक रीत्या दर्शवले आहे. संकष्टी व विशेष समारंभाच्या दिवशी म्हणजे वैशाख शुद्ध त्रयोदशीला (देवाचा प्रतिष्ठापना दीन )आणि भाद्रपदात गणेश चथूर्तीपासून सात दिवस किंवा गणेश जयंती या प्रसंगी गणपतीची खास अलंकारयुक्त सजावट करतात. भव्य मूर्तीत सात्त्विकतेबरोबर प्रसन्न मुद्रा दिसते.
गर्भगृहाचे छत तत्कालीन स्थापत्यशैलीची जणू एक किमयाच म्हणावी लागेल. चुना आणि फरशीचा समन्वय साधून ते वास्तुशास्त्रज्ञांनी वसाहतकालीन मंगलोरी कौलांच्या बंगल्यातील छताप्रमाणे तंबूसदृश वर निमुळते केले आहे. अशा प्रकारची छते (विताने) प्रमुख द्वारावरील जो पाचरीसारखा दगड बसवितात त्या केवळ की-स्टोनच्या(कळीचा दगड) साह्याने तग धरून असतात. ही छते तासलेल्या पाषाणाला खाचा पाडून खोबणीत दुस-या-दगडाचे कुसू अडकवून तयार करीत आणि त्यांना घोटलेल्या चुन्याचे सांधीत.
महागणपतीचे शिखर हे वाईतील सर्व मंदिरामध्ये सर्वांत उंचअसून त्याची पायथ्यापासून कळसापर्यंतची उंची सु.२४ मीटर आहे.

No comments:

Post a Comment